प्रति, प्रवासी पुणेकर. मु.पो. दरवाज्यात. तालुका : गर्दीच्या रांगेत. जिल्हा : मिळेल त्या शीटवर प्रिया पुणेकर रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या सोबत आम्ही रोजच्या रोज न थकता आपल्या सेवेत असतो. रोजच्या गर्दीत आम्ही तुमच्याशी काही बोलावे असे नेहमी वाटत असते परंतु ते काही शक्य होत नाही. म्हणून आज पत्र लिहून आपल्याशी चार गोष्टी करत आहे. पत्रास कारण कि, नवीन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आमची चुलत बहीण मेट्रो आता आपल्या सेवेत येत आहे. तेव्हा आमच्याकडे फारसे लक्ष दिले जाईल असे वाटत नाही. म्हणून तुम्ही पूर्णच विसरून जाण्याआधी काही आठवणी आणि अडचणी आपणास सांगण्यासाठी आम्ही सर्व जणी मिळून हे पत्र लिहीत आहोत. १९४० पासून पुणे शहराच्या सेवेत आम्ही वेगवेगळ्या नावाने कार्यरत आहोत. त्यापैकी पी एम टी नाव आपल्या सर्वांच्या ओळखीचे आणि जिव्हाळ्याचे असावे. पहाटे ५.३० पासून रात्री १२ वाजे पर्यंत आम्ही तुमच्या सेवेत धावत असतो. कोणी कामावर जात असते , कोणी शाळा कॉलेजात , कोणी पाहुण्यांकडे तर कोणी खरेदीसाठी जाण्यासाठी निघतात, तेव्हा तुम्हाला वेळेवर आणि सुखरूप पोहचवण्या साठी आम्ही सदैव तत्पर असतो.वेळेप्रमाणे आम