हरित क्रांतीच्या
आधी पर्यंत शेतकरी पूर्वांपार चालत आलेली आपली
देशी वाण किंवा देशी बियाणे वापरात होते. म्हणजेच शेतात उभ्या असणाऱ्या पिकांमधुन सुदृढ
पिकातील दाणे बियाणे म्हणून शेतकरी जपून ठेवत आणि तेच पुढील पिकासाठी पेरणी करत असे.
ह्यामध्ये गैर हि काही नव्हते आणि शेतकऱ्याला बियाणे विकत घेण्याची हि गरज नव्हती.
आजही शेतकरी बऱ्याच पिकांमध्ये हे करतात. परंतु जसे आपल्या शरीरात एखाद्या जीवजंतूंची
कमतरता किंवा अधिक मात्रा झाल्यामुळे आपली तब्बेत बिघतले तशी सजीवच असणाऱ्या वनस्पतींची
(पिकांची) हि बिघडते. जोपर्यंत आपल्याकडे वेगवेगळ्या लसीकरणाचे शोध लागायचे होते किंवा
त्या पोहचायच्या होत्या तोपर्यंत साथीच्या रोगांनी रस्त्यावरील लाईटच्या खांबाखाली सकाळी लाईटवर घोंगावणारी
पाखरे मरून पाडावीत अशी माणसे मरत होती.
गावेच्या गावे एकाच वेळी स्मशानात जात होती.
वेगवेगळ्या लस शोधल्या गेल्या आपले शरीर प्रतिकारक बनावे म्हणून लहानपणीच त्या आपल्या
शरीरात सोडल्या गेल्या. आणि जवळ जवळ आपण अश्या साथीच्या रोगांवर विजयच मिळवला. हीच
वेळ वनस्पतींवर पण आली होती. सततचा दुष्काळ, विविध किडींचा प्रादुर्भाव आणि कमजोर होत
जाणाऱ्या बियाण्यांची उत्पादकता ह्यावर शास्त्रज्ञांनी उपाय शोधायला सुरवात केली. एकाच
प्रजाती मध्ये म्हणजे दोन वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये किंवा दोन प्राण्यांमध्ये नैसर्गिकरित्या
मिलन घडवून आणल्यास एकाचे असणारे चांगले गुण नवीन उत्पादन होणाऱ्या बियाण्यामध्ये किंवा पुढच्या पिढीमध्ये उतरतात आणि ते सुदृढ बनतात
किंवा खराब गुण उतरले तर कमजोर बनतात. नाहीतरी प्रत्येक पोर आई किंवा बापावर जातेच
की अगदी तसेच शास्त्रज्ञांनी अभ्यास करून एखादी सहनशील क्षमता ठराविक बियाण्यामध्ये
नैसर्गिक रित्या कशी उतरवता येईल याचा शोध घेतला आणि संकरित बियाणे बनवायला सुरवात
केली.
त्याची मर्यादा एवढीच होती कि त्या बियाण्यांची एकच पिढी उत्कृष्ट बनेल आणि ते
बनवण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धत अवलंबावी लागेल त्यामुळे बियाणे कंपन्यांनी त्यामध्ये
उडी घेऊन अश्या प्रकारच्या बियाण्यांचा व्यवसाय उभा केला. यामध्ये अजूनही शेतकऱ्यांकडे
पर्याय होताच कि नेहमीचे देशी बियाणे वापरावे किंवा विकतचे संकरित बियाणे वापरावे.
एवढे उन्हाळे पावसाळे खाऊन शहाणा झालेल्या शेतकऱ्याने संकरित बियाण्यांना पसंती दिली.
विरोधाच्या अफवा उठवणाऱ्यांच्या तोंडावर त्यांचेच शाहनपण फेकून मारले आणि तेही संकरित
ज्वारी ची गव्हाची रोटी खाऊ लागले. नपुसंकत्व दूरच राहिले पण लोकसंख्येला महापूर मात्र
नक्की आला. हि पहिलीच वेळ होती कि उत्पादक शेतकऱ्याने त्याला जे हवे ते करायचे ठरवले
आणि तसे केले सुद्धा. संकरित गायी म्हशींच्या वाढलेल्या दुधामुळे जनावरे पाळणाऱ्या
शेतकऱ्याला चार पैसे सापडू लागले जोडधंदा मिळू लागला परंतु त्याच्याही विरोधी उठणारी
तोंडे कमी नव्हती झाली . शेती हा एकमेव असा व्यवसाय आहे ज्यामध्ये उत्पादकाला नव्या
तंत्रज्ञाच्या वापरासाठी हजारो प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात.
बियाण्यांच्या
या पहिल्या प्रयोगाला शेतकऱ्यांनी पसंती दिली आणि जवळ जवळ सर्व पिके हि संकरित बियाण्यांपासून
पिकू लागली. आत्ताचं माहिती नाही पण तेव्हा शेतकऱ्याचं शेतातील उत्पन्न दुप्पट नक्की
झालं होत. त्याची प्रचिती म्हणूनच गेल्या ३०-४० वर्षात भारत देशाने दुष्काळ पहिले असतील
परंतु कोणाच्या दारात मदतीसाठी पुन्हा उभी राहण्याची वेळ आली नाही. धान्य पिकांसोबत
कापूस हि संकरित झाला होता.
कापूस पिकावर वांगे या पिकानंतर सर्वाधिक किडी किंवा कीटक
येतात जे त्याच्या उत्पन्नावर आघात करत असतात. त्यामुळे सर्वाधिक कीडनाशके आणि कीटक
नाशके हि कापूस पिकावर फवारली जातात. उत्पन्न वाढले तसेच त्यावर उत्पादन खर्चही वाढू
लागला. कापसाची संकरित वाणे बऱ्याच किडीना सहनशील बनली होती. उत्पन्न आणि धाग्याची
प्रत दोन्ही हळू हळू सुधारू लागली होती. देशात हायब्रीड शब्द चांगलाच प्रचलित झाला
होता. कधी तो चिडवण्यासाठी तर कधी आधुनिकतेचे जणू प्रतीक असल्यासारखा वापरला जाऊ लागला.
६०-७० च्या दशकातील शेतकऱ्यांची हि पहिली लढाई यशस्वी झाली खरी परंतु विकतच्या बियाण्यांवर
अवलंबित्व वाढले. पिके सहनशील बनली परंतु शेती शिक्षणाअभावी जमिनीची वाताहत व्हायला
सुरवात झाली. हायब्रीड युगाला सुरवात झाली होती आणि शेती संशोधनाने वेग घ्यायला सुरवात
केली होती.
क्रमश:
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा