"दोन वर्षात
महाराष्ट्राला अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही केल्यास मी वसंतराव फुलसिंग
नाईक भर चौकात फासावर जाईन,"असा वायदा करून कायम सूट बुटात असणारा हातात पाईप असलेला
देखणा मुख्यमंत्री त्याच सुटाबुटात कोणत्याही सोशल मीडिया च्या हव्यासाविना १९६० च्या
दशकात शेतकऱ्याच्या शेतात जाऊन हातात खुरपी घेऊन तण काढू लागला. एकीकडे दुष्काळाशी
दोन हात करण्यासाठी पंतप्रधान एक वेळचे अन्नत्याग करून जय जवान जय किसान घोषणा देत
होते तर एकीकडे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन आधुनिक
शेतीचा मंत्र देत होते. भारतरत्न डॉ.स्वामिनाथन यांनी हरितक्रांतीची पेटवलेली मशाल
महाराष्ट्राच्या गावागावात तेवत ठेवण्याचे काम हरित क्रांतीचे प्रणेते मा.मुख्यमंत्री
स्व.वसंतराव नाईक यांनी केले. हे ऐकायला किंवा वाचायला जरी सोपे वाटत असले तरी प्रत्यक्षात
ते किती क्रांतिकारक होते हे आज पिझ्झाचे तुकडे तोडताना आपल्या लक्षात सुद्धा येणार
नाही. कधी घरातल्या थोरा-मोठ्यांकडून डुकरांचे खाद्य असलेल्या लाल गव्हाच्या गोष्टी
ऐकल्यावर कशी माणसे हि जनावरांच्या ताटात खात होती याचे भळभळते अंजन आपल्या डोळ्यात पडेल.
कधी ऐकले वाचले नसेल तर डोकं ताळ्यावर ठेऊन ऐकावं लागेल कि त्यावेळी ही हरित क्रांती ला मोठा विरोध झाला होता. हि क्रांती कशी चुकीची आहे ह्याच्या चर्चा चालू होत्या. ह्याचं कारण काय तर अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांचा शोध आणि प्रात्यक्षिके करून दाखवणाऱ्या शास्त्रज्ञांनी संकरित (हायब्रीड) बियाण्यांच्या वापराचा प्रस्ताव दिला होता. ह्या बियाण्यांपासून तयार झालेल्या गहू किंवा ज्वारी खाल्ल्यामुळे नपुसंकत्व येईल अश्या अफवा उठवल्या गेल्या. जमिनीला भेगा पडतील, विचित्र रोग होतील एक ना दोन शेकडो व्हल्गना उठवल्या जात होत्या. आजही एक वर्ग त्या हरितक्रांतीच्या चळवळीला नावे ठेवताना आसपास दिसेल.. रासायनिक खतांचा वारेमाप
वापर आणि शेतीचे अपुरे शास्त्रशुद्ध शिक्षण यामुळे आज जमिनीची वाताहत झाली आहे हे नाकारता
येणार नाही. परंतु जर त्यावेळी संकरित बियाण्यांचा आणि रासायनिक खतांचा वापर नसता केला
तर आज फोन वरून जेवण मागविता आले असते कि नाही हे सांगता येणार नाही.
भारतामध्ये आज
९० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी संकरित बियाणांचा वापर करतात. कोणी याची टीकाही करेल.
बियाणे कंपन्यांनी केलेली लूट पण म्हणेल. पण कदाचित हे विसरले असतील कि भारत देश आज
अन्नधान्याच्या बाबतीत जो स्वयंपूर्ण झाला आहे , कोणाकडे उधार धान्य मागावे लागत नाही,
शेतकरी वर्गात थोडी का होईना जी सुबत्ता आली ती या आधुनिक शेती तंत्रज्ञानाकडे वळल्यामुळेच
आली. कसं आहे ना कि लोकांना CDMA चे जी.एस.एम.
झाले, त्याचे टू जी झाले, थ्री जी झाले, फोर जी झाले ह्यावर काहीच आक्षेप नाही. पण
शेती किंवा शेतकरी जर तंत्रज्ञानाच्या गोष्टी करायला लागला तर मात्र कपाळावर प्रश्नचिन्ह
नक्की उभे राहते. त्यावेळी वाढत्या इंटनेटच्या वापरामुळे खराब झालेली पिढी बघण्यापेक्षा
जवळ आलेले जग दिसेल परंतु शेतकऱ्याने, कृषी संशोधकाने अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी काही
नवीन प्रयोग करायचं ठरवलं तर मात्र त्याचे निसर्गावर, प्राण्यांवर आणि माणसांवर काय
काय परिणाम होतील हे आधी जाणून घेणे अपरिहार्य ठरते.
जसे
कोणत्याही महाकाय वृक्षाचा जन्म एका छोट्याश्या बीजा पोटी होतो तसा पोटात जाणार प्रत्येक
घास हि कोणत्यातरी बीजातून अंकुरलेल्या असतो. संपूर्ण जगामध्ये आजपर्यंत आणि आजमितीलाही
केल्याजाणाऱ्या शेतीची पहिली गुंतवणूक हि बियाण्यामध्ये असते. भारतामध्ये ६०% पेक्षाही
जास्त लोकांचा व्यवसाय असणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यवसायाची सर्वात पहिली गुंतवणूक हि
बियाणे असते. इतर व्यवसायांच्या पहिल्या गुंवणूकीलाही सीड कॅपिटलच म्हणतात. इवल्याश्या
वाटणाऱ्या ह्या बियाण्याचे महत्व, त्याचा अभ्यास आणि त्यांचा प्रवास कापूसगोष्ट पूर्ण
करण्यासाठी अतिशय महत्वाचा ठरतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा