प्रति, श्री.पुणेकर ट्रॅफिकवाले. मु.पो.गाडीवर तालुका-चालू गाडीवर जिल्हा-हॉर्नपूर. प्रिय पुणेकर, नमस्कार, सादर प्रणाम !.मी लालबत्ती सिग्नलवाली. बऱ्याच दिवसांपासून तुमच्या सर्वांशी बोलायचं होत. आज मराठी राजभाषा दिनाच्या शुभ मुहूर्तावर पत्र लिहायला घेत आहे. जे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्यापर्यंत पोहचेल अशी अपेक्षा करते आणि मुख्य विषयाकडे वळते. पत्रास कारण कि , सततचा होणार अपमान आता मला सहन होत नाही. आपल्या पुण्याचा चौका चौकात मी दिवसभर भर उन्हात आपल्या सर्वासाठी जळत उभी असते परंतु माझ्या अस्तित्वाला नेहमी पुणेरी टोमणा मारल्या सारखे बरेचशे पुणेकर न जुमानता निघून जातात. माझी शेजारीण पिवळी बत्ती आपल्याला नेहमी माझ्या येण्याची आठवण करून देत असते आणि आपणास वेग कमी करण्यास सुचवत असते. परंतु आपण शेवटी पुणेकरच ना गाडीच्या भोंग्याचा आवाज वाढवत, मला धुडकावून लावत. आपण उलट अजूनच वेगाने निघून जाता. शेवटी माझ्या इज्जतीचे रक्षण करण्यासाठी उभे असलेले आमचे पोलीस बंधू पाहून तुम्ही कसे बसे थांबता. मी हे सर्व वरून पाहत असते. थांबल्यावर हि आपले वाहन बंद न करता भोंग्यावर हाताचे वजन वाढवून मला घाबरवत असत