मला असं वाटतंय ....
मला, तुम्हाला आणि आपण सर्वाना खूप काही वाटत असतं . कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेता व्हायचंय,कोणाला नेता व्हायचंय , कोणाला कलाकार तर कोणाला उद्योजक व्हायचंय. हे वाटणं काही चुकीचं नाही. कारण काही तरी वाटल्याशिवाय काही तरी बनता पण येत नाही. सर्वच जण अपघाताने किंवा नशिबाने आयुष्याच्या उत्तुंग शिखरावर नक्कीच पोहचत नाहीत. काही तरी, कोणी तरी बनण्याची उर्मीच आपल्याला त्या शिखरापर्यंत घेऊन जात असते.
मला वाटतं कि मी मुख्यमंत्री व्हावं , महाराष्ट्राचं भलं करावं , भ्रष्टाचार मोडून काढावा , राजकारण शुद्ध करावं , शहरांचा विकास करावा. पण हे वाटणं तुमच्या माझ्या सत्य परिस्थितीबद्दल काहीच बोलत नाही. जे बोललं जात ते भविष्याबद्दल , जे अजून घडायचं आहे. सोबतच हे वाटत असताना मी एक सामान्य नागरिक आहे, रोज महागतलं पेट्रोल डिझेल साठी रांगेत उभा असतो, निवडणुका आल्या कि रोजच्या जीवनातल्या अडचणी सोडून भलत्याच गोष्टींना बळी पडून , चार पैसे घेऊन , मान मोडलेला , स्वाभिमान मेलेला क्षुद्र मतदार आहे. ज्याला निवडणुकी नंतर काडीची किंमत नाही हे विसरून जातो. घर , गाडी चे हप्ते , टॅक्स चे हप्ते देऊन कंगाल होत चाललेला, खड्डे, तुंबलेले गटारं-रस्ते यातून मार्ग काढणारा सामान्य नागरिक आहोत आपण मुख्यमंत्री किंवा कोणताही मंत्री नाही आहोत हे आपण सहज विसरून जातो.
मला असं वाटतं कि मी एखाद्या कंपनी चा सिइओ व्हावं , न्यूज मध्ये, सोशल मीडिया मध्ये हवा करावी. पण हे वाटत असताना त्याच कंपनी मध्ये आपण आपल्या इनक्रेमेन्ट ची वाट पाहणारे साधे नोकरदार आहोत हे हि विसरून जातो. मला तुम्हाला आणि सर्वांनाच जे करावं वाटतं , त्याची स्वप्न आपण बघतो.
नेहमी मोठी स्वप्न बघावी , असं आपल्याला शिकवलं हि जातं पण ती का बघावी ह्याचं कोड उलगडताना जी स्वप्नं आपण पाहतो त्यामध्ये आपण आत्ता कुठे आहोत,सत्य परिस्थिती काय आहे थोडक्यात आपण किती पाण्यात आहोत, थोडं कडक शब्दात आपली लायकी काय आहे ह्याचं उत्तर दडलेलं असतं . आता जर हे समजलं आहे कि आपण कोण आहोत,कुठे आहोत काय आहोत तर आपण पाहिलेल्या स्वप्नापर्यंत जाण्याचा मार्ग आपण शोधू लागतो. कुठे जायचं आहे हे नक्की झालं कि कसं जात येईल याची तयारी करता येते. या तयारीची पहिली पायरी म्हणजे स्वतःची लायकी म्हणा किंवा जागा शोधणं हि आहे आणि याच साठी मोठी स्वप्नं बघायची असतात.
मला काय वाटतं हे पक्क झालं , स्वप्न नक्की झालं आता त्याचा मार्ग शोधा . त्या मार्गावर पुढे जाण्यासाठी काय शिदोरी लागेल याची यादी करा. त्या मार्गावर काय अडचणी येतील याची यादी करा. त्या अडचणींवर कशी मात करता येईल याच्या योजना बनवा. पर्यायी मार्गांचा विचार करा. काहीही करा फक्त मागे फिरू नका. मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करताना जरी पूर्ण यश नाही आले तरी त्या मार्गावर अनेक छोटी छोटी स्वप्ने पूर्ण होतील,त्याचा उपभोग घ्या ,आनंद साजरा करा.
मनाला वाटेल ते वाटेल त्याच्याबद्दल लिहायचे आहे , त्यांना पात्र लिहून कळवायचे आहे. नावात काय आहे? असे विचारणाऱ्या शेक्सपिअर ला ओरडून सांगायचे आहे नावात ओळख आहे आणि ती ओळख बनवायची आहे. महाराष्ट्राचा कोपरांकोपरा धुंडाळायचा आहे आणि या महाराष्ट्रासाठीच जगायचं आहे. मराठी साहित्य कोळून प्यायचं आहे. चित्रपट आणि पुस्तकांमध्ये स्वतः ला हरवायच आहे. महाराष्ट्राच्या गाव तालुक्याची चव चाखायची आहे. पोटापेक्षा जिभेसाठी आणि सत्यापेक्षा उद्देशापाठी जायचं आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा