काय बदलले , काय बदलले ? रंग ना हलले रूप बदलले खाणाऱ्यांचे मार्ग बदलले. वेळेवरती बाप बदलले जखमेवरचे मीठ बदलले. काय बदलले काय बदलले ? टोचणारे काटे बदलले चकवणारे फाटे बदलले, वाट्याचे वाटे बदलले, होणारे घाटे बदलले. काय बदलले, काय बदलले ? मर्दानगीचे नियम बदलले, देशभक्तीचे नाव बदलले खरे खोट्यात बदलले आणि खोटे नाहीच बदलले. काय बदलले काय बदलले ? लोकांचे ग्रह बदलले, ग्रहांचे तारे बदलले, शब्दांचे वापर बदलले, स्वतः शब्द पण बदलले. काय बदलले काय बदलले ? फेसबुकचे फायदे बदलले, ट्विटर चे तोटे बदलले, व्हाट्सअपने सत्य बदलले, टीव्हीने तर आपले धंदे बदलले. काय बदलले काय बदलले ? देवांचे काम बदलले, बोलणाऱ्यांचे राम बदलले, महापुरुषांचे मान बदलले, दानपेटीमधले दान बदलले. काय बदलले काय बदलले ? शेतीचे प्रश्न बदलले ? उत्तरांचे स्वर बदलले, शेतावरच चोर बदलले, आणि फासावरचे दोर बदलले. काय बदलले काय बदलले ? बुद्धिबळातले प्यादे बदलले, लावायचे घोडे बदलले, पुस्तकातले धडे बदलले, आणि लोकशाहीचे खांबच बदलले. - स्वरराज.
मनाला वाटेल ते वाटेल त्याच्याबद्दल लिहायचे आहे , त्यांना पात्र लिहून कळवायचे आहे. नावात काय आहे? असे विचारणाऱ्या शेक्सपिअर ला ओरडून सांगायचे आहे नावात ओळख आहे आणि ती ओळख बनवायची आहे. महाराष्ट्राचा कोपरांकोपरा धुंडाळायचा आहे आणि या महाराष्ट्रासाठीच जगायचं आहे. मराठी साहित्य कोळून प्यायचं आहे. चित्रपट आणि पुस्तकांमध्ये स्वतः ला हरवायच आहे. महाराष्ट्राच्या गाव तालुक्याची चव चाखायची आहे. पोटापेक्षा जिभेसाठी आणि सत्यापेक्षा उद्देशापाठी जायचं आहे.